university

निकाल गोंधळामुळे वेळापत्रकाला फटका

Webdesk | Saturday, April 28, 2018 1:36 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमासह इतर परीक्षांचे वेळापत्रक सतत बदलावे लागले असून, निकाल वेळेवर जाहीर न झाल्याने हा फटका बसत असल्याची कबुली मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी गुरुवारी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाची माहिती देण्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलविली होती. त्यावेळी परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या डॉ. अर्जुन घाटुळे यांनी वरील माहिती दिली. 'विद्यार्थ्यांच्या हितानुसारच वेळापत्रक बनविले जाते. पण लॉ अभ्यासक्रमाचे निकाल उशिराने लागल्याने नियोजित वेळापत्रक मागे घ्यावे लागले. निकालाच्या कामांचा आढावा घेऊनच वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते. मात्र तरीही ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने वेळापत्रक बदलावे लागले', असे घाटुळे म्हणाले. 'निकालाचे काम आता योग्य पद्धतीने आणि वेळेवर होण्यासाठी परीक्षा विभागाने आवश्यक ते सर्व उपाय राबविले आहेत. त्यामुळे यापुढे अशी वेळ येणार नाही', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.