university

शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया आजपासून

Webdesk | Wednesday, January 24, 2018 3:45 PM IST

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी बुधवारपासून (दि. २४) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शहरातील सुमारे ९८ शाळांमधून २ हजारावर जागांसाठी तर जिल्ह्यात सुमारे ४५० शाळांमधून सुमारे ६ हजारांवर अशा एकूण ८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या अंतर्गत १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे. 

शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात याणार आहे. ऑनलाइनद्वारे १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज आल्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेची पहिली सोडत जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेशाचे विविध टप्पे यात पार पडतील. पहिल्या सोडतीनंतर १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सोडतमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्याला प्रत्यक्षात प्रवेश दिला जाईल. ७ आणि ८ मार्च रोजी दुसरी सोडत काढण्यात येईल. यात निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना ९ ते २१ मार्च दरम्यान प्रवेश पूर्ण करावा लागेल. २६ आणि २७ मार्च रोजी तिसरी सोडत जाहीर होणार आहे. २८ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. 

या प्रक्रियेत विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्यांक शाळा वगळून), स्वयं अर्थ सहाय्यीत शाळांमध्ये नर्सरी आणि प्राथमिक प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.