university

पुन्हा वेळापत्रक गोंधळ!

Webdesk | Wednesday, April 11, 2018 1:56 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दोन दिवसांपूर्वीच ३० परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असतानाच, एसवायबीकॉमची परीक्षा 'सीए' परीक्षेसोबतच आल्याने ती पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली असून, सायन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनीही मंगळवारी विद्यापीठाकडे सह्यांचे निवेदन देत परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या 'परीक्षा वेळापत्रक गोंधळाचा तास' यंदाही भरल्याचे दिसून येते. 

विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना निकालाच्या आणीबाणीला सामोरे जावे लागले. या गोंधळाचा थेट फटका हिवाळी सत्रातील परीक्षांना बसला. त्यातून सावरत विद्यापीठाने आगामी उन्हाळी परीक्षांसाठी कंबर कसली असतानाच यंदाही 'वेळापत्रक गोंधळ' झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली. त्यानंतरही आता काही परीक्षांच्या वेळांबाबत आक्षेप घेत त्या पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. वेळापत्रक ठरवताना विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे. 

मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फेही प्रभारी प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांची भेट घेण्यात आली. येत्या सात दिवसांत प्रलंबित निकाल जाहीर करण्याची मागणी करताना एसवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी संघटनेने केली आहे. ही परीक्षा 'सीए' परीक्षेदरम्यान आल्याने ही मागणी करण्यात आल्याचे अभाविपचे रवी जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मागण्यांबाबत परीक्षा विभाग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.