university

मूल्यांकन प्रक्रियेचा गोंधळ; ८७ उत्तरपत्रिका गायब

Webdesk | Tuesday, November 21, 2017 1:49 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्राध्यापकांनाही सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या मूल्यांकन प्रक्रियेच्या गोंधळामुळे एका प्राध्यापकाच्या खात्यातून ८७ उत्तरपत्रिका गायब झाल्याचे उघडकीस आले असून त्याचे पुरावे ‘मटा’ला प्राप्त झाले आहेत.

उत्तरपत्रिका न तपासणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केल्यानंतर या गहाळ प्रकरणामुळे प्राध्यापकांच्या नाराजीत भर पडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे विद्यापीठात उद्भवलेल्या निकालाच्या आणीबाणीमुळे विद्यार्थी आजही हैराण आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. हे ऑनलाइन मूल्यांकन करताना अनेक प्राध्यापकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. यंदा हा प्रकार होऊ नये म्हणून पेपर तपासणी न करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने नुकताच जाहीर केला. या निर्णयावरून सध्या वाद सुरू असतानाच या नवीन प्रकाराने प्राध्यापकवर्गाच्या भुवया उंचविल्या आहेत.

ऑनलाइन मूल्यांकन करणाऱ्या एका प्राध्यापकांनी टीवायबीकॉमच्या सहाव्या सत्राच्या ऑडिटिंग आणि कॉमर्स या दोन विषयांची पेपर तपासणी केली होती. मात्र या प्राध्यापकांच्या वर्कलिस्टमधील एकूण उत्तरपत्रिकांपैकी ८७ उत्तरपत्रिकांची माहितीच उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्राध्यापकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या खात्यावर परिणाम झाला असून त्याची कोणतेही माहिती मिळालेली नाही. याबाबत या प्राध्यापकांनी परीक्षा विभागाशी संपर्क साधला होता. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.