students

ग्रामसभेची जबाबदारी घेण्यास शिक्षकांचा नकार

Webdesk | Saturday, January 27, 2018 8:00 PM IST

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी शिक्षकांकडे देऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेही हे शिक्षकांचे काम नसल्याचे सांगत त्यावर बहिष्कार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. 

ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक असतात, मात्र त्यांनीच याकामी हात झटकल्याने या ग्रामसभांचे कार्यवृत्तांत लिहिण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. याविरुद्ध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ग्रामसभेचे कार्यवृत्तांत लिहिण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, केल्यास कार्यवृत्तांत लिहिण्यास पूर्णपणे बहिष्कार राहील, असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांना दिले आहे. 

संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप,कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेही हे काम शिक्षकांचे नसल्याचे सांगत ते करण्यास नकार दिला आहे. शिक्षकांनी बहिष्कार टाकलेले काम ग्रामसेवक किंवा तलाठ्यांकडून प्रशासन करवून घेणार आहे का, असा सवाल सेनेने केला आहे. ग्रामसभा आयोजित करण्याची जबाबदारी शिक्षकांकडे देऊ नये, अशी मागणीही सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार,सरचिटणीस सदानंद माडेवार, कार्याध्यक्ष संतोष आढाव पाटील आदींनी केली आहे.