higher-education

शिक्षकांचे पगार होणार ऑफलाइन

Webdesk | Saturday, February 3, 2018 10:43 PM IST

नगर : शालार्थ प्रणालीच्या डेटाबेसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शालार्थ वेतन प्रणाली बंद पडली होती. या अडचणींमुळे शिक्षकांचे पगार उशिरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार ऑफलाइन होणार आहेत. राज्य सरकारच्या उपसचिवांनी तसे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. १० फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांचे पगार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. 

ऑनलाइन शालार्थ प्रणाली बंद पडल्यानंतर शिक्षण विभागाने ऑफलाइन पगारासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते; मात्र, प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपसचिव चारुशिला चौधरी यांना शिक्षकांचे पगार ऑफलाइन करण्याची मागणी केली. त्यानंतर पगार ऑफलाइन करण्याचे आदेश देण्यात आले. या आठवड्यात ज्या शाळांनी यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने पगार बिले वेतन पथकाला सादर केले आहे. त्यांचे पगार पाच दिवसांत होतील तसेच ज्या शाळांची पगार बिले अपलोड झाली नाहीत, अशा शाळांनी दोन ते तीन दिवसांत जानेवारी महिन्याचे पगार बिल वेतन पथकास सादर करावे. त्यासोबत डिसेंबर २०१७ च्या पगार बिलाची प्रत जोडावी, अशी माहिती वेतन पथक कार्यालयातून देण्यात आल्याचे गाडगे यांनी सांगितले. शाळांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास १० फेब्रुवारीपर्यंत पगार जमा होणे शक्य होणार आहे.