higher-education

आरटीई प्रवेशांना जानेवारीत प्रारंभ

Webdesk | Friday, December 22, 2017 10:36 PM IST

पुणे : शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत आहे. यासंदर्भातील परिपत्रक येत्या आठवड्यातच निघणार असून यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

समाजातील उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या खासगी शाळांमध्ये एंट्री पॉइंटनुसार विनाशुल्क प्रवेश मिळावा, यासाठी राज्यात २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेस जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुरुवात होणार असून साधारण २ जानेवारी रोजी आरटीई प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची, यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात येईल. त्यानंतर ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विज्ञान सल्लागार आणि शिक्षण उपनिरिक्षक यांना विभाग स्तरावरील नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी तक्रार निवारण केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रांवर विस्तार अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार आहेत. केंद्रावर इंटरनेटच्या जोडणीसह संगणक, प्रिंटर व इतर साधने उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान, अल्पसंख्याक शाळांना आरटीई प्रवेशापासून कायद्यानेच सूट दिली आहे. त्यामुळे त्यांना आरटीई प्रवेशाची सक्ती करता येणार नाही. त्यासाठी कायद्यात बदलाची आवश्यकता आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.