higher-education

परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

Webdesk | Thursday, January 4, 2018 11:26 AM IST

मुंबई : आंबेडकरी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर थेट परिणाम झाल्याने मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फटका बसला. सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्या असल्या तरी दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. त्यामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापान मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी जाहीर केले. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचे पडसाद मुंबईतही उमटणार हे निश्चित होते. मात्र मुंबई विद्यापीठाच्या जवळपास १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा असल्याने विद्यापीठातर्फे सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. या परीक्षांसाठी एक तास उशिरा पोहोचण्याची सवलत विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिली होती. मात्र शहरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि रेल्वे रोको करण्यात आल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून सुधारित निर्णय जाहीर न झाल्याने अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाचे दार ठोठावून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. काही पालकांनीही परीक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने नवे परिपत्रक जाहीर केले.

या पत्रकानुसार आंदोलनामुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रात वेळेत पोहोचू शकले नाहीत त्यांची परीक्षा नव्याने घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे बी. ए, बीएससी, बी. कॉम, बी. सीए आणि एल. एल. बी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.