higher-education

‘मावा’तर्फे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन

Webdesk | Sunday, January 14, 2018 6:11 PM IST

मुंबई : स्त्री आणि पुरूष यांच्याकडे पाहण्याची समाजाची पारंपरिक, साचेबद्ध चौकट मोडून लैंगिक विविधतेचा स्वीकार करण्याच्या उद्देशाने 'मेन अगेन्स्ट व्हायलन्स अॅन्ड अब्युज' (मावा) या संस्थेने आंतर महाविद्यालयीन पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. लिंगभेद, लैंगिक विविधताया विषयावर येत्या २९ आणि ३० जानेवारी रोजी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 

महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात समविचारी पुरुषांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेमार्फत भित्तीचित्र, निंबध, घोषवाक्य, वक्तृत्व, समूह गायन, पथनाट्य व लघुपट निर्मिती अशा एकूण ७ स्पर्धांचे आयोजन मुंबईत दादर येथील अमर हिंद मंडळात करण्यात आले आहे. स्त्री वा पुरूषाला समाजात सन्मानाने आणि सुरक्षितपणे माणूस म्हणून जगता यावे, तसेच व्यक्तिगत लैंगिक विविधतेचा स्वीकार सर्वांनी करावा हे दर्शविणारे सांस्कृतिक आविष्कार या स्पर्धेद्वारे तरूणांनी करावे असे आवाहनही संस्थेचे सचिव हरीश सदानी यांनी केले आहे.