higher-education

उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

Webdesk | Monday, January 8, 2018 1:11 PM IST

मुंबई : मुंबईसह राज्यात विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांची संख्या वाढत असल्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तंत्रशिक्षण, दूरस्थ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे नुकतेच प्रकाशात आले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

देशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती दर्शविणारा अहवाल दरवर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात येतो. त्यानुसार सन २०१६-१७च्या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नुकतेच दिल्लीत करण्यात आले. या अहवालानुसार देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्रात ९ लाख ४० हजार ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या तर दिल्ली ७ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशांसह तिसऱ्या स्थानावर आहे.