higher-education

पेपरफुटी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना गॅजेटबंदी

Webdesk | Thursday, May 31, 2018 2:42 PM IST

'दहावी आणि बारावी परीक्षेच्या कालावधीत सोशल मीडियावरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी प्रक्रियेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना परीक्षा कालावधीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करता येणार नाही. शिवाय परीक्षा केंद्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार असून, सीसीटीव्ही आणि मोबाइल जॅमरचाही वापर करण्याचा विचार सुरू आहे,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी बुधवारी दिली. 

व्हॉट्सअॅपवरून होणारी पेपरफुटी 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा'साठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. दरम्यान, यंदाही बारावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले. जवळपास १ हजार ३९ कॉपीची आणि तोतयागिरीची १२ प्रकरणे मंडळाने उघडकीस आणली. व्हॉट्सअॅपमुळे दहावी आणि बारावीच्या पेपरला सुरुवात होण्यापूर्वी तसेच परीक्षेदरम्यान पेपर व्हायरल होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह अन्य लोकांना मोबाइल, टॅब, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, एखाद्या ठिकाणावरून पेपर परीक्षा केंद्रांवर घेऊन जाण्यात येत असतील तर, अशा ठिकाणांवरील अंतराचाही सर्वे करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांची मंडळाकडून चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कडक कारवाईही करण्यात येणार आहे. परीक्षांदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीही लावण्यावर भर देण्यात येणार आहे. सीसीटीव्ही लावण्याचा खर्च अधिक असल्याने त्यासाठी शाळांची मदत घेण्यात येणार असून, प्रसंगी मोबाइल जॅमरचाही विचार करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले आहे. पेररफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांची त सायबर सेलकडून चौकशी करण्यात येत असल्याचेही डॉ. काळे यांनी नमूद केले.