higher-education

बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

Webdesk | Saturday, February 3, 2018 10:41 PM IST

ठाणे : सरकारची काही धोरणे शिक्षणविरोधी असल्याचा आरोप करत विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यासह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी संप पुकारला होता. या संपामुळे बहुसंख्य महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपस्थित नव्हते, त्यामुळे लेक्चरच झाली नाहीत. दरम्यान आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांच्या संघटनेने दिला आहे. 

राज्य सरकारकडून काही महत्त्वाच्या मागण्या मान्य होत नसल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आंदोलनांचे हत्यार उपसले आहे. आतापर्यंत १९ डिसेंबर, १७ व १८ जानेवारी रोजी या संघटनेतर्फे आंदोलने करण्यात आली. पण सरकारकडून दाद न मिळाल्याने अखेर शुक्रवारी शिक्षकांतर्फे मुंबईत जेलभरो व राज्यभरात संप पुकारण्यात आला होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरी स्वीकारलेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. सन २०१२ पासूनच्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती व मान्यता देण्यात यावी, त्यांना सध्या वेठबिगारांप्रमाणे मिळणारी वर्तणूक थांबवावी, कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, २४ वर्ष सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवडश्रेणी द्यावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करावा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी शुक्रवारी संप पुकारला होता, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली. सरकारने आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. ठाणे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद होती, अशी माहिती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा. दत्तात्रय चितळे यांनी सांगितले. आम्ही जेलभरो आंदोलन करणार होतो. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकरी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. यावेळी १००च्या आसपास शिक्षक उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. 

या संपाची विद्यार्थ्यांना माहितीच नव्हती. त्यामुळे ते सकाळीच महाविद्यालयात आले. पण शिक्षकच संपावर असल्याचे समजल्यावर त्यांनाही मनस्ताप झाला.सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा सुरु आहेत. त्याचवेळी शिक्षक संपावर जात असल्याने सराव कसा करावा आणि ऐन परीक्षेच्या वेळी संप झाला तर काय होईल, अशी विद्यार्थ्यांना चिंता आहे.