higher-education

विद्यार्थी परिषद निवडीस ५ जानेवारीपर्यंत मुदत

Webdesk | Wednesday, December 27, 2017 8:44 AM IST

मुंबई : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी परिषद गठित करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थी परिषद गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९९, उपकलम (२) (ख) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात येणार आहे. यात प्रत्येक कॉलेजसाठी एक विद्यार्थी परिषद असेल. त्यामध्ये प्राचार्य हे सभापती असतील तर प्राचार्यांकडून नामनिर्देशित केले जाणारा एक अधिव्याख्याता, राष्ट्रीय छात्रसेनेचा प्रभारी अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी, मागीलवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्याने विद्याविषयक गुणवत्ता दर्शविली आहे आणि जो पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकत आहे, असा प्राचार्य नामनिर्देशित केलेला प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी, संचालक क्रीडा व शारिरीक शिक्षण, क्रीडा तसेच रासेयो-प्रौढ शिक्षण, राष्ट्रीय छात्रसेवा आणि सांस्कृतिक कार्य यात यश मिळविलेला असा प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेला प्रत्येकी एक विद्यार्थी, प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या दोन विद्यार्थिनी या सर्वांचा समावेश राहील. नामनिर्देशित करताना उपकलम ७ व ८ सदस्यांमध्ये दोन विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांच्यामधील असतील, असेही यात म्हटले आहे. विद्यार्थी परिषद सदस्यांमधून सचिव पदाची निवड प्रक्रिया येत्या ५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावयाची आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.