higher-education

वेगळ्या शिक्षण पद्धतीची देशाला गरज

Webdesk | Monday, January 15, 2018 8:49 PM IST

कोल्हापूर : ‘नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागत असताना या समस्येचे मूळ शिक्षणात आहे, हे विसरुन चालणार नाही. आज घडीला ७५ टक्के अभियंते बिनकामी बसून आहेत. ९० टक्के पदवीधर नोकरी लायक नाहीत. ९५ टक्के पीएचडीधारक निरुपयोगी आहेत, असे अहवाल सांगतात असतील त्याचा अर्थ कधीतरी तपासला पाहिजे. अशा चुकीच्या शिक्षण पद्धतीचा कुठेच, काहीच उपयोग होत नसेल तर आता वेगळी शिक्षण पद्धती आणावी लागेल,’ असे स्पष्ट मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार आणि प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरमच्या वतीने कर्मयोगी पुरस्कार रविवारी रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, आमदार सुमन पाटील, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, संचालक गौतम पाटील, वैभव नायकवडी आदी या वेळी उपस्थितीत होते.
डॉ. पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनीही शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. डॉ. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. १७० जाती जमातींच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेला ९८ वर्षे पूर्ण झाली असून, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्कारातून संस्थेला मोठी स्फूर्ती मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्मवीर अण्णा आणि प्राचार्य पी. बी. पाटील या दोघांनाही यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, जे. पी. नाईक, अशा मोठ्या माणसांचे सहकार्य मिळाल्यामुळे कमवा व शिका योजनेतून त्यांना हजारो माणसे उभे करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग व्यवसायिकांना आपल्या फायद्यातील १० टक्के वाटा शिक्षणासाठी ठेवलाच पाहिजे, असे कर्मवीर अण्णांनी १९२०मध्ये सांगितले होते. एक विद्यार्थी आणि ३० रुपयांच्या बजेटवर अण्णांनी जेव्हा रयत शिक्षण संस्था सुरू केली तेव्हा अनेक अडचणींमध्ये केवळ वहिनींच्या योगदानामुळे संस्था टिकून राहिली. महात्मा गांधी यांनी त्यावेळी ५०० रुपयांची देणगी संस्थेला दिली होती. गोर-गरीब बहुजन समाज आणि संस्थानिकही त्यांच्यामागे उभे राहिले. तब्बल ३३ हार्ट अ‍ॅटॅक येऊनही केवळ प्रचंड मानसिक ताकदीच्या जोरावर अण्णांनी शिक्षणाचे कार्य तडीला नेले. आजही रयत सेवक आणि लोकसहभागामुळेच रयतची वाटचाल जोमाने सुरू असल्याची त्यांनी सांगितले. गुगलवरही दिसणार नाहीत अशा दुर्गम भागामध्ये रयत शाळा सुरू ठेवल्या आहेत. जलयुक्त बंधारे उभे केले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ४१ मुलांना रयतने दत्तक घेतले आहे, असेही डॉ. अनिल पाटील म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. या वेळी शामराव जगताप व टी. डी. पाटील यांना माई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. हणमंत साळे यांनाही सन्मानित करण्यात आले. थोरात अ‍ॅकॅडमीच्या इनचार्ज समिता पाटील व मंजुश्री पवार यांच्या हस्ते अनुराधा मोरे यांचा सत्कार करण्यात आला. रंगावलीकार संतोष ढेरे यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला.