university

‘आरटीई’ नोंदणीस खोडा

Webdesk | Friday, January 12, 2018 8:30 PM IST

मुंबई : इंग्रजी शाळा संस्था चालकांनी थकबाकीसाठी तगादा लावल्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेसमोर आव्हान उभे राहिले आहे. विशेष निधीसाठी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू असला तरी गुरुवारी संस्थाचालकांच्या बैठकीत तूर्तास आरटीई प्रवेशासाठी नोंदणी न करता सोमवारनंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बालकांना शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी शाळांना एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वंचित घटनातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांचा सरकारस्तरावर निश्चित केलेला वार्षिक शैक्षणिक शुल्काचा परतावा सरकारकडून थेट शाळांना प्रतिपूर्ती केली जाते. परंतु २०१३ -१४ पासून ते २०१७-१८ पर्यंत इंग्रजी शाळांची तब्बल १५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा संस्था चालकांकडून मागील तीन वर्षांपासून ही थकबाकी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गुरुवारी ‘मेस्टा’ (महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत तरी नोंदणी करायची नाही, असा निर्णय घेतला. थकबाकी कशी मिळवता येईल, यासाठी न्यायालयीन लढाईचीही तयारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिली. बैठकीला मनीष हंडे, प्रवीण आव्हाळे, राजेश नगर, अर्चना आहेरकर, रत्नाकर फाळके, मनाले बहादुरे, अशोक गोरे, मनीषा जोशी आदींची उपस्थिती होती.