university

मुंबई विद्यापीठात अध्ययन केंद्र अधांतरीच

Webdesk | Monday, January 22, 2018 11:13 AM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरणे रोजच समोर येत असताना या अनागोंदी कारभाराचा फटका आता इतर कामांनाही बसत आहे. सात वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेले महाराष्ट्र अध्ययन केंद्र उभारण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आले आहे. मुख्य म्हणजे, या अध्ययन केंद्रासाठी लाखो रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करूनही हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र अध्ययन केंद्राचा प्रस्ताव फक्त कागदावरच राहिला की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील संस्कृती, खेळ, इतिहास, परंपरा यासारख्या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. विजय कोल्हे यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र अध्ययन केंद्र सुरू करण्याची प्रस्तावित केले होते. यासाठी आतापर्यंत दोन समित्या नेमण्यात आल्या असून यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात सुमारे १८ लाख ४६ हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही या केंद्राची उभारणी करण्यात आलेली नाही. सात वर्षांपासून हे केंद्रच न उभारल्याने हे मुंबईसह राज्यातील विद्यार्थी या सुविधेपासून वंचित राहिले आहे.

विद्यापीठाला यासंदभार्त वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत कार्यवाही न झाल्याची खंत माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र अध्ययन केंद्रामधून महाराष्ट्राची ओळख सर्वांसमोर होणार आहे. त्याबाबत विद्यापीठ किती उदासीन आहे, हे यातून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पापूर्वी याबाबत कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.