university

विद्यापीठ निवडणुका अखेर जुन्या कायद्यानुसार

Webdesk | Monday, January 15, 2018 8:40 PM IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर विद्यार्थी संघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका जुन्या कायद्यातील तरतुदीनुसार, मेरिटच्या पात्रतेवर होणार आहेत. त्यानुसार संलग्नित कॉलेजेसमध्ये २२ जानेवारीला विद्यार्थी संघाकरिता निवडणुका होतील. तर स्थापन झालेल्या विद्यार्थी संघातून कॉलेज प्रतिनिधींची निवडणूक २९ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संघाची स्थापना होणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात नमूद विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुका न घेता जुन्या कायद्यानुसार, निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थी संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. परंतु, नागपूर विद्यापीठात निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, सरकारकडून नवा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. कावडकर यांनी २२ जानेवारीला संलग्नित कॉलेज, विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग आणि तीन संचालित कॉलेजेसमध्ये विद्यार्थी संघ स्थापन करण्याची अधिसूचना काढली. त्या विद्यार्थी संघातून २९ जानेवारीला कॉलेज सचिवाची निवडणूक घेण्यात यावी, असे विद्यापीठाने कळविले आहे. त्या कॉलेज सचिवांची नावे विद्यापीठाला दोन फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर विद्यापीठस्तरावरील विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येणार आहे.
विद्यापीठ संलग्नित कॉलेजेस आणि पदव्युत्तर विभाग येथे विद्यार्थी संघ तयार करण्यासाठी प्रत्येक वर्गातील अकॅडमिक मेरिटवीर विद्यार्थ्यांची निवड करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या मेरिटवीरांमधून नंतर एक विद्यार्थी कॉलेज अथवा कॅम्पसचा सचिव म्हणून निवडून येणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या विद्यार्थी संघावर ताबा मिळवण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. विद्यार्थी संघाचा अध्यक्ष व सचिव सिनेटचे सदस्य राहणार आहेत. त्यामुळे सिनेटमधील संख्याबळ वाढवण्यासाठी या दोन सदस्यांचा फायदा मिळणार आहे.