university

लॉच्या ‘परीक्षाघाई’चा प्रश्न उच्च न्यायालयात

Webdesk | Thursday, January 18, 2018 9:09 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर करण्यासंदर्भात घातलेल्या गोंधळामुळे एलएलबी अभ्यासक्रमाचे प्रवेश अत्यंत विलंबाने म्हणजे गेल्या महिन्यात झाले असताना विद्यापीठाने पहिल्या सत्राचा आवश्यक कालावधी पूर्ण न करताच महिन्याभरातच परीक्षा ठेवली आहे. या निर्णयाविरोधात दोन विद्यार्थ्यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

एलएलबीच्या प्रथम वर्षासाठी वांद्रे येथील जी. जे. अडवाणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या साईनाथ पवार व शरद कोळी यांनी अॅड. कमलजित सिंग यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. त्याविषयी बुधवारी प्राथमिक माहिती देण्यात आल्यानंतर न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. 

प्रवेशप्रक्रिया लांबल्याने आमचा प्रवेश अखेरच्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१७ रोजी झाला. एलएलबीच्या पहिल्या वर्षातील सर्व विषय पाहता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसे लेक्चर होणे आणि विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१० नियमांप्रमाणे राज्य सरकारने स्वतःही परिपत्रक काढलेले आहे. त्यानुसार, प्रत्येक सत्रासाठी किमान ९० दिवसांसाठी कालावधी असणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे तितक्या संख्येत लेक्चरही होणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २९ जानेवारीलाच परीक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कॉलेजांमधील शिक्षणाचे दिवस लक्षात घेता केवळ १७ शैक्षणिक दिवस आमच्या वाट्याला आले असून एवढ्या कमी कालावधीत सर्व विषयांचा अभ्यास होणे कठीण आहे. त्यामुळे सत्राचा कालावधी पूर्ण करून आणि आवश्यक संख्येत लेक्चर झाल्यानंतरच परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठ व परीक्षा नियंत्रण विभागाला द्यावेत, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे. दरम्यान, एलएलबीप्रमाणेच एलएलएमचाही तिढा आहे. एलएलएमचीही प्रवेशप्रक्रिया काही दिवसांपूर्वीच संपली असताना विद्यापीठाने लगेचच परीक्षा ठेवली आहे. त्यामुळे एलएलएमचे विद्यार्थीही उच्च न्यायालयात याचिका करण्याच्या तयारीत आहेत.