university

अभ्यासक्रमात बदल करा

Webdesk | Thursday, December 28, 2017 12:56 PM IST

पुणे : अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश पूर्व परीक्षा देण्यासाठी सक्षम व्हावेत, म्हणून परीक्षा पद्धती बदलण्यापेक्षा अभ्यासक्रम समकक्ष करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होऊ लागली आहे. सध्या परीक्षापद्धतीतील बदलांअंतर्गत, अकरावीच्या परीक्षेत सर्व प्रश्न सक्तीचे करण्यात आले असून परिणामी अकरावीच्या नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षांचा निकाल चांगलाच घसरला आहे.

येत्या काळात इंजिनीअरिंग आणि मेडिकल ‌शिक्षणासाठी देशभरात एकच सामायिक प्रवेश परीक्षा ठेवली जाणार आहे. इंजिनीअरिंगसाठी राज्यात स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असली, तरी वैद्यकीय ‌शिक्षणासाठी देशपातळीवरील ‘नीट’ ही परीक्षाच घेतली जाते. मात्र आपल्याकडे त्या परीक्षांना सामोरे जाता येईल, असा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षा अवघड जात असल्याचे दिसते. राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देणे सोपे जावे, या उद्देशाने सरकारने अकारावीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. या नवीन बदलानुसार विद्यार्थ्यांना पर्यायी प्रश्न उपलब्ध नसेल. परिणामी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. याचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेत सुमारे ४० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. असेच होत राहिले, तर अकरावी आणि बारावीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, असे मत सायन्स परिवारचे सुभाष जोशी यांनी सांगितले. सरकारने परीक्षा पद्धती बदलण्यापूर्वी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. आजही आपल्याकडील भौतिकशास्त्र विषयाचे पुस्तक केंद्राच्या अभ्यासक्रमाशी मिळते जुळते झालेले नाही. रसायनशास्त्र विषय हा केंद्राच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ९० टक्के समान झाला आहे. तरी इतर विषयांतही साध्यर्म्य येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी वाढवणे अपेक्षित असताना, परीक्षेची काठिण्य पातळी वाढवणे चुकीचे असल्याचेही जोशी यांनी नमूद केले.