students

नेट परीक्षेत यंदापासून दोनच पेपर्स

Webdesk | Friday, January 26, 2018 11:27 AM IST

मुंबई : सहायक प्राध्यापक तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपकरिता घेण्यात येत असलेल्या नेट परीक्षेच्या नियमांमध्ये यंदापासून बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तीन पेपर्सच्या जागी आता परीक्षार्थ्यांना केवळ दोन पेपर्स द्यावे लागणार आहेत. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नेट परीक्षा घेण्यात येते. ८ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असून, ६ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून ५ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. यंदापासून परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. पूर्वी नेट परीक्षेत तीन पेपर्स द्यावे लागत. आता, पेपर्सची संख्या एकने कमी करण्यात आली आहे. तीनऐवजी आता दोनच पेपर्स घेण्यात येत आहेत. पहिला पेपर १०० गुणांचा राहणार असून त्यात सामान्य ज्ञान, शैक्षणिक अभिरुची इत्यादीवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. दुसरा पेपर हा परीक्षार्थ्यांनी निवडलेल्या विषयावर आधारित असेल. दोन्ही पेपर्समध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. पहिल्या पेपरसाठी एक तास तर दुसऱ्या पेपरसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. पहिल्या पेपरमधील प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा तर दुसऱ्या पेपरमधील प्रत्येक प्रश्न हा एका गुणाचा असेल.