students

चारशे शाळांत सव्वा पाच हजार जागा रिक्त

Webdesk | Wednesday, February 7, 2018 9:51 PM IST

चारशे शाळांत सव्वा पाच हजार जागा रिक्त

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ३९५ शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्क्यांप्रमाणे पूर्व प्राथमिकसाठी १६८ आणि इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी ५ हजार २१४ जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत त्यांच्या प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत प्रवेश दिले जात आहेत. यासाठी जिल्ह्यातील ३९५ शाळा पात्र ठरल्या असून येथील सव्वा पाच हजार जागा मोफत भरल्या जाणार आहेत. यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यानंतर अर्जांची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीतून पात्र लाभार्थी निवडले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चापोटी राज्य सरकारकडून संबंधित शाळेस अनुदान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

शिक्षण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेचा मागील तीन ते चार वर्षांचा अनुभव चांगला नाही. मोफत प्रवेश असतानाही सर्व जागा भरल्या जात नाहीत. मुदतवाढ दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जागा रिक्त राहतात. काही वेळेस तर अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरीही प्रवेशाची प्रक्रिया मात्र सुरूच राहते. अनुदान उशिरा मिळते तसेच शाळांच्या दृष्टीने अनुदान कमी असल्यानेही शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जागा रिक्त राहत असल्याचा अनुभव आहे. या अडचणी कायमच जाणवत असल्याने मागील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू केली जात आहे.