higher-education

यू ट्यूब चॅनेलवरून शिका गणित

Webdesk | Monday, April 16, 2018 2:52 PM IST

 यू ट्यूब चॅनेलवरून शिका गणित

गणिताची आकडेमोड करताना भल्या भल्यांना घाम फुटतो. विद्यार्थ्यांना गणित हा विषय इतर विषयांच्या तुलनेने अवघड वाटतो. उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गणिताला महत्त्व असते. हाच धागा पकडून सांगली जिल्ह्यातील दहिवडीला (ता. तासगाव) असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक एन. डी. पाटील व अजय काळे यांनी गणित विषयाचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे व्हिडिओ चित्रित केले असून, ते यू ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. 

या अभिनव प्रयोगाबाबत सांगताना काळे म्हणाले, की 'आम्ही दोघेही बालमित्र आहोत. प्रशासकीय बदलीने शाळेत पुन्हा एकत्र आलो. दोघांनाही नावीन्याचा ध्यास असल्याने सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करण्याची सवय होती. या प्रबळ इच्छेतून आपल्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर शिक्षणाची ओळख व्हावी, या हेतूने २००९ मध्ये लॅपटॉपची खरेदी केली. आपापल्या वर्ग आणि विषयानुसार व्हिडिओ, पीपीटी यांचा संग्रह केला. स्वतः निर्मिती केली.' सातत्याने याचा वापर केल्याने यातील कौशल्य वाढले. डिजिटल क्रांतीच्या प्रसाराने शहरी भागात नेटच्या मिळणाऱ्या सोयी आता ग्रामीण भागात ही उपलब्ध होऊ लागल्याना याचा फायदा घेतला. यातच तासगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी 'संगणक क्रांती'वर भर दिल्याने शिक्षकांच्या प्रचलित दृष्टिकोनात बदल होउन लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन यांचा वापर करण्याची आवड निर्माण झाली. याचे महत्त्व समजल्याने परिसरात संगणक क्रांतीच्या प्रसाराचा वेग वाढला. 

शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात पाटील यांनी गणितातील नियमांची सीडी खरेदी करून ती शाळेत विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर दाखविली. नंतर काही दिवसांनी जेव्हा घातांकाच्या नियमांची उजळणी दरम्यान मुलांमध्ये उत्तरे देण्याच्या, लिहिण्याच्या पद्धतीत झालेला बदल लक्षात आला. याची पडताळणी केल्यावर लक्षात आले, की सीडी दाखविल्याचा हा परिणाम आहे. ही घटना त्यांनी मला यांना बोलून दाखवली. त्यानंतर आम्ही गणित सोडविण्यासाठी लागणारे विविध व्हिडिओ तयार करून ते शाळेच्या कम्प्युटरवर सेव्ह करून ठेवले. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे ते विद्यार्थ्यांना दाखविण्याला सुरुवात केली. व्हिडिओ पाहणे मुलांना खूप आवडू लागले. मुलांचा उत्साह वाढला. मात्र, याला मर्यादा होत्या. यातून यू ट्यूब ही संकल्पना सुचली. त्याचा अभ्यास केला आणि तंत्रस्नेही शिक्षकांशी चर्चा केली. आमच्या कल्पनेत असणारी यू ट्यूब चॅनेलची संकल्पना गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात उतरवली. आतापर्यत 'अजय काळे टेक गुरू' या चॅनेलचे १२१२ जणांनी सदस्यत्व घेतले असून साधारण ५० हजार नेटिझन्सनी चॅनेलला भेट दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.