higher-education

विद्यार्थी हिताची नीती हवी

Webdesk | Wednesday, December 27, 2017 8:49 AM IST

जळगाव : इंग्रजांनी तयार केलेली नीती ही स्वार्थापोटी तयार केलेली होती. सत्ताधारीदेखील हीच नीती वापरत आहेत. त्यामुळे देशाल बदल घडवायचा असेल तर विद्यार्थी हिताची नीती तयार करा, असे आवाहन अभाविपचे राष्ट्रीय मंत्री भूपेंद्रनाथ यांनी केले. देशात मोठ्या प्रमाणात शिक्षित विद्यार्थी आहे. परंतु, त्यांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांना बेरोजगाराला सामोरे जावे लागत आहे, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी (दि. २५) शहरातील सुभाष चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. भूपेंद्र नाथ म्हणाले की, अभाविप कोणाचाही व्यक्तिगत घोषणा देत नसून, त्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणा देतात. तसेच अभाविपचे कार्यकर्ते हे विद्यार्थी व समाजाप्रती असलेली जाण या दुहेरी भूमिकेतून कार्य करीत असतात. तसेच विद्यार्थी हे आजचे नागरिक असल्याने त्यांनी समाजाप्रती असलेली भूमिका निश्‍चित केली पाहिजे, असे भूपेंद्र नाथ यांनी सांगितले. विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात परंतु, यामध्ये रोजगारक्षम अन् संस्कारक्षम शिक्षणाचा अभाव असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांसमोर बेरोजगारीचा दाट अंधार पसरलेला आहे. त्यामुळे भविष्यात आपणदेखील बेरोजगार होणार असून या बेरोजगारीस दोषी कोण, असा सवाल भूपेंद्र नाथ यांनी विद्यार्थ्यांसमोर उपस्थित केला.